| पनवेल | प्रतिनिधी |
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून खारघरमधील एका तरुणाला सुमारे सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पवन कुमार असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव सचिन कुमार असून तो खारघर सेक्टर-10 मध्ये राहण्यास आहे. सचिनने मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे तो त्या क्षेत्रातील नोकरीच्या शोधात होता. मार्च महिन्यात सचिनला फेसबुकवर कोचीन येथील डॉल्फीन शिपिंग कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात निदर्शनास आली. त्याने या जाहिरातीवरील मोबाईल नंबरवर आपली माहिती पाठविली होती. त्यानंतर पवनने सचिनला कोचीन येथे नोकरी असल्याचे सांगत तेथे त्याला 37 हजार रुपये पगार मिळणार असून या नोकरीसाठी 2 लाख रुपये देण्याची मागणी केली.
सचिनने एक लाख रुपये पाठवून दिल्यानंतर त्याला मुंबई ते कोचीन हे विमानाचे तिकीट पाठवून दिले. 57 हजारांची रक्कम पाठवल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी तो मुंबई विमानतळावरून विमानाने कोचीन येथे गेला. त्यानंतर पवनने त्याचा फोन उचलणे बंद करून त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई गाठून त्याने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.