आदिवासी तरुणीची राजकीय भरारी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली. आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेली प्रतिभा कारोटे ही तरुणी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. डॉक्टर होण्याआधी ती संरपच झाल्याने तिच्यावर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. राजकारण करताना सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे प्रतिभाने स्पष्ट केले.
अशोक करोटे हे नांदगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय आहेत. आदिवासी समाजाचे असून देखील आपल्या कुटुंबातील मुलांनी शिकले पाहिजे या उद्देशाने अशोक कारोटे यांनी सर्व मुलांना शिक्षण दिले. त्यांची प्रतिभा ही मुलगी बीएचएमएसचे शिक्षण घेत आहे. मात्र वडिलांकडून घेतले समाजसेवेचे व्रत आपण देखील पुढे न्यावे यासाठी प्रतिभाने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा ही प्रचंड मतांनी ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आली.
भौगोलिक दृष्ट्या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. साधारण 2500 लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत चिंचवाडी या आदिवासीवाडीमध्ये अशोक कारोटे यांचे कुटुंब राहते. कारोटे यांना दोन मुले असून ते गेली अनेक वर्षे आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत. प्रतिभाचे माध्यमिक आणि 12 वीपर्यंतचे शिक्षण कशेळे येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात झाले. या काळात प्रतीभाला जिएनएममधून नर्स होण्याची संधी मिळाली, मात्र आपल्या गावात डॉक्टर नाही, तेव्हा मला डॉक्टर व्हायचे आहे, असे तिने वडिलांना सांगितले.
नीटच्या तयारीसाठी कल्याण, ठाणे येथे क्लासेस होते. मात्र तिथे जाऊन येऊन प्रवास कठीण होता. तचेच आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नव्हते. ऑनलाईन माहिती घेऊन तीन अभ्यास केला. प्रतिभाने परीक्षा पास करत थेट बीएचएमएससाठी अलिबाग येथील चंद्रकांत हरी केळुसकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. यंदाचे प्रतिभाचे शेवटचे वर्ष आहे. आता निवडणुक जिंकून ती अत्यंत कमी वयाची सरपंच झाली आहे.