शिक्षकांवर ‌‘आधार’चा भार

ऐन सुट्टीत दुरुस्तीची कामे; जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार असणे बंधनकारक आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील पाच लाख 11 हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. मात्र नावात, जन्मतारखेत बदल, स्पेलिंगमध्ये बिघाड अशा अनेक चुका आधार कार्डमध्ये निर्माण झाल्या आहेत. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांवर ऐन सुट्टीत भार सोपविण्यात आला आहे.

संच मान्यतेसाठी आधार क्रमांक व अचूक माहिती असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते सातवी, आठवी ते बारावीपर्यंतचे पाच लाख 22 हजार 81 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु असून, पालक वर्गांसह शाळेतील शिक्षकही कामाला लागले. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख 11 हजार 661 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे.

मात्र, यातील काही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये शाळेतील रजिस्टर व आधार कार्डवर वेगवेगळी जन्मतारीख असा प्रकार दिसून आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या नावात बदल झाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या जात, लिंग, नावात चुका दिसून आल्या आहेत. त्याचा परिणाम सरळ प्रणालीमध्ये अपलोड करूनदेखील तो ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्याचे काम शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे. ऐन सुट्टीच्या काळात मुख्याध्यापक, शिक्षक अथवा कर्मचाऱ्याच्या मदतीने ही दुरुस्ती, मोबाईल अथवा लॅपटॉपद्वारे हे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच संकेतस्थळाच्या सर्व्हरला नेटवर्कचे अडथळे, स्लो मोडमुळे अनेकांना वेळेत काम करण्यास समस्या निर्माण होत आहे. आतापर्यंत तीन लाख 72 हजार 420 विद्यार्थ्यांचे आधार वैध ठरविण्यात आले असून, 72 टक्के पूर्ण झाले आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये चुका आढळून आल्या आहेत, त्यांची दुरुस्ती करण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आलेय. दुरुस्तीनंतरच ते आधार वैध ठरविले जाणार आहे. आतापर्यंत तीन लाख 72 हजार विद्यार्थ्यांचे आधार वैध ठरविण्यात आले असून, उर्वरित काम शालेय स्तरावर सुरु आहे.

सुनील भोपाळे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

आधार दुरुस्तीचे काम ऐन सुट्टीत सोपविले आहे. सुट्टी पडल्याने अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत. तरीदेखील शिक्षक जोमाने काम करीत आहेत. मात्र, शाळा सुरु झाल्यावर शिबीर घेऊन दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी केली जात आहे.

राजेंद्र म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा रायगड
Exit mobile version