दिल्ली महापालिका! आप बहुमताच्या पार, भाजपची दमछाक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीला आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. कल कायम राहिल्यास दिल्ली महापालिकेत आपला बहुमत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 126 हा मॅजिकल फिगर असलेल्या दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाचा झाडू चालला असून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीच्या कलांनुसार आप आणि भाजप यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास उलटल्यानंतर चित्र काहीसं स्पष्ट होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपची 15 वर्षांची सत्ता खालसा करण्यास सुरुवात केली आहे.

दुपारी सव्वाबारा वाजताची आकडेवारी पाहिल्यास (मतमोजणी सुरु असताना) आप 89 जागा जिंकून 47 जागी आघाडीवर (एकूण 136) आहे, तर भाजपने 69 जागा जिंकत 32 जागांवर आघाडी (एकूण 101) घेतली आहे. काँग्रेसने 4 जागा जिंकल्या असून पाच जागांवर आघाडी (एकूण 9) घेतली आहे. तर तीन जागा इतर उमेदवारांकडे जाताना दिसत आहेत.

बहुतांश एक्झिट पोल्सनी दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरताना दिसत आहे. दिल्ली निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी राजधानीत एकूण 42 मतमोजणी केंद्रे स्थापन केली आहेत. शास्त्री पार्क, यमुना विहार, मयूर विहार, नंद नगरी, द्वारका, ओखला, मंगोलपुरी, पितामपुरा, अलीपूर आणि मॉडेल टाऊनमध्ये ही मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चार डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या 250 जागांसाठी मतदान झाले होते.

मतमोजणीसाठी 68 निवडणूक निरीक्षक आधीच तैनात करण्यात आले आहेत. यावेळी दिल्ली महापालिका निवडणुकीत 250 प्रभागांमध्ये एकूण 1 हजार 349 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात लढत पाहायला मिळाली. एक्झिट पोलमध्येच काँग्रेस स्पर्धेतून बाद असल्याचं चित्र होतं.

Exit mobile version