। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास लागण्यात आहे. सध्या निवडणुकीत भाजप 155 जागांवर, काँग्रेस 18, आप 6 आणि अपक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत. निवडणुकीत आप मोठे यश मिळवेल असा दावा केला जात होत. पण तो आता फोल ठरताना दिसत आहे. तरीही गुजरातच्या जनतेने आपला गुड न्यूज दिली आहे. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत जसा दावा केला जात होता त्यानुसार आम आदमी पक्षाला मोठं यश मिळताना दिसत नाही. तरीही आपसाठी एक गुड न्यूज आली आहे. दिल्लीत आपच्या कार्यालयाबाहेर एक मोठा बोर्ड लावण्यात आला आहे. आप राष्ट्रीय पक्ष बनल्याने सर्व देशवासीयांचे अभिनंदन, असं या बोर्डवर लिहिलं आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणार्या आपला गुजरात विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या कलानुसार जवळपास 14 टक्के मतं मिळताना दिसत आहे. एवढचं नव्हे तर आप सध्या किमान 5 ते 6 जागांवर आघाडीवर आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकांचे निकाल काल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा आपने मोठा पराभव केला. यामुळे आजच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत आप काय कमाल करणार याची उत्सुकता लागली आहे. गुजरातमध्ये आपला मोठे यश मिळेल, असा दावा केला जात होता. पण तसंच होताना सध्यातरी दिसत नाहीए. पण आपच्या नेत्यांनी ट्विटमधून गुड न्यूज दिली आहे.
पंजाब आणि राजधानी दिल्लीत आपचे सरकार आहे. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीपूर्वी गोव्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत आपचे दोन उमेदवार निवडून आले. निवडणुकीत आपला 6.8 टक्के मते मिळाली होती. गुजरातमध्ये सध्या आपचे सहा उमेदवार आघाडीवर असले तरी हिमाचाल प्रदेशात मात्र आपच्या झाडूची जादू काही चालताना दिसत नाही. हिमाचलमध्ये अद्याप भोपाळाही फोडलेला नाही. तरीही आपची उपस्थिती मात्र नाकारता येणार नाही. आकडे बघता आपची वाटचाल ही एका राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने होत आहे.
पक्षाचे नेते गोपाल राय यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. गुजराती जनतेच्या पाठिंब्याने आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होणार आहे. विकास कामाचे राजकारण ही आता राष्ट्रीय राजकारणाची ओळख बनत चालली आहे. आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन, असं गोपाल राय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमध्ये 12 टक्के मतं मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.