डॉक्टरांअभावी आपला दवाखाना बंद

तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा

| तळा | वार्ताहर |

तळा शहरात सुरू करण्यात आलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना डॉक्टरांअभावी गेल्या दहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या दवाखान्यासाठी दर महिन्याला शासनाकडून भाडे स्वरूपात देण्यात येणारे अठरा हजार रुपये वाया जात असून तळा तालुक्यात सध्या आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गेल्यावर्षी 1 मे 2023 रोजी तळा मांदाड रस्त्याशेजारी असलेल्या मुद्राळे यांच्या जागेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले होते. शहरी भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उपयोग व्हावा यासाठी राज्यस्तरावरून हे आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करण्यात आले होते.मात्र या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली नसल्याने अवघ्या चार महिन्यातच हा दवाखाना बंद पडला आहे.सुरुवातीस डॉ.भुरके यांच्यासह एक स्टाफ नर्स व एक आरोग्य सेवक यांची नेमणूक करण्यात आली होती मात्र डॉ भुरके गेल्यानंतर त्यांच्या जागी डॉक्टर उपलब्ध झाला नसल्याने परिणामी आपला दवाखाना बंद पडला आहे. तसेच या दवाखान्याचे भाडे म्हणून शासनाकडून दर महिन्याला अठरा हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु गेल्या दहा महिन्यांपासून हा दवाखाना बंद असल्याने दर महिन्याला अठरा हजार रुपये प्रमाणे शासनाचा निधी वाया जात आहे.त्यामुळे शासनाने आपला दवाखाना मध्ये डॉक्टर व कर्मचारी वर्ग मंजूर करावा तसेच सदर आपला दवाखाना शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करावा जेणेकरून गरजू रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version