| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमध्ये नुकतीच राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पर्धेत मुंबईमधील आग्रीपाडा येथील आराध्य सचिन त्रिशुले याने कांस्यपदक मिळवून भरारी घेतली. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आराध्य त्रिशुले (10) हा मुंबईमधील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या तो इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला गेल्या वर्षी लाठीकाठी खेळण्याची आवड निर्माण झाली. आईवडिलांनी त्याची ही आवड ओळखून त्याला लाठीकाठीचे धडे देण्याचे ठरवले. प्रशिक्षक सुधीर कांबळे यांच्या माध्यमातून त्याने लाठीकाठीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मुंबई येथील अंधेरीसह चेन्नई येथे होणाऱ्या लाठी स्पर्धेत त्याने यश संपादन करून पदक, चषक व प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर अलिबागमध्ये राज्यस्तरीय अजिंक्यपद लाठी स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. वयोगटातनुसार झालेल्या स्पर्धेत आराध्यने उत्कृष्ट कामगिरी बजावून या खेळात घवघवीत यश मिळविले. दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत त्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती सचिन जयराज त्रिशुले यांनी दिली.







