सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आबासाहेबांचा त्याग

सांगोल्यात स्मृतीदिनी विविध कार्यक्रम

| कोळा | वार्ताहर |

पावसाच्या रूपाने आजही गणपतराव देशमुख आबासाहेब यांची कृपा सांगोला तालुक्यावर असल्याचे दिसून येत आहे. गोरगरीब, दिनदलित, बहुजन वंचित समाज उभा रहावा म्हणून आबासाहेब आयुष्यभर झटले. त्यामुळे समाजकारणी राजकारणी रुपी पांडुरंग म्हणजे स्व.आबासाहेब असून सध्याचे परिस्थितीतील सभोवतालचे वातावरण पाहून आज स्व.आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन पंकज महाराज गावडे यांनी सांगोला येथे केले.

माजी मंत्री स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमीत्त सूतगिरणीच्या समाधीस्थळावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पंकज गावडे यांनी प्रवचन व कीर्तन सोहळ्यातून देशमुख यांच्या कार्याचा गौरव करून जागर करण्यात आला. यावेळी आ.शहाजीबापू पाटील, आ.गोपीचंद पडळकर, आ.समाधान आवताडे, मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील, भगीरथदादा भालके, धनराज शिंदे, प्रणव परिचारक, भाऊसाहेब रुपनर, चेतनसिंह केदार सावंत प्राध्यापक पी.सी.झपके सर, जगदीश कुलकर्णी, केदार सावंत, अभिजित आबा पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके आदी मान्यवरांसह राज्यभरातील सर्व पक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकत्यांनी स्व.गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहिली.

यावेळी पुढे बोलताना गावडे म्हणाले की, आबासाहेबांमुळे सांगोला तालुक्याची ओळख क्रांतीकारी तालुका म्हणून ओळखला जावू लागला आहे. स्व.आबासाहेब आपल्यातून गेले नसून अदृश्य रुपी आजही ते आपल्यात आहेत. आबासाहेबांनी आयुष्यभर तत्वांचे राजकारण केले असून सांगोल्यातील हुशार जनतेमुळे आबासाहेबांनी विधिमंडळ थरारले. सांगोला तालुक्यात जे आज सोने पिकत आहे ते केवळ आणि केवळ आबासाहेब यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. स्व.आबासाहेब यांच्यावर आजही जीव ओवाळून टाकणारी माणसे तालुक्यात पाहून मला आनंद झाला असून स्व.आबासाहेब आयुष्यभर जीवन जगले त्यामुळे आज ही लोकांचे एव्हढे प्रेम त्यांच्या कुटुबियांना मिळत असून यापुढील काळात त्यांचा विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचेही गावडे महाराजांनी शेवटी त्यांनी सांगितले.

यावेळी इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार संजय खडतरे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, मुख्याधिकारी सुधीर गवळी, कृषीअधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून स्व.गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. सर्वांचे स्वागत रतनबाई देशमुख, पोपटराव देशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले. यावेळी तालुका परिसरातील शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version