| पनवेल | वार्ताहर |
पीडब्ल्यूडी आस्थापनेवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मागील सहा ते सात महिन्यांपासून वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर त्यांचे वेतन करण्यात यावे, अशा प्रकारचे पत्र रायगड जिल्हा सुरक्षारक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियन यांच्यातर्फे सरचिटणीस विनायक गांधी यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, खांदा कॉलनी यांना दिले आहे.
रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांतर्गत असलेल्या पीडब्ल्यूडी आस्थापनेवर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करून सहा-सात महिने झाले आहेत. मात्र, या सुरक्षारक्षकांना आजतागायत केलेल्या कामाच्या वेतनरुपी मोबदला आस्थापनेकडून न झाल्यामुळे मंडळाकडून अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या सुरक्षारक्षकांना कामावर ये-जा करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली आहे. व त्यांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तरी या सुरक्षारक्षकांना मंडळाकडून निदान पाच महिन्यांचे थकित वेतन लवकरात लवकर मिळावे जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशा आशयाचे पत्र रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला देण्यात आले आहे.