। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्राचा मोठा सन्मान होणार आहे. येत्या 26 जुलैपासून 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकला सुरवात होणार आहे. यादरम्यान त्याचा ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकसाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्याला हा प्रतिष्ठीत सन्मान देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे.
‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे. 1975 सालापासून हा सन्मान देण्यात येतो. त्यापूर्वी ‘ऑलिम्पिक डिप्लोमा ऑफ मीरीट’ हा सन्मान देण्यात येत होता. भारतीयांमध्ये ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा पुरस्कार यापूर्वी 1983 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही देण्यात आला होता. अभिनवला हा सन्मान दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडाविया यांनी केली.
दरम्यान, अभिनव बिंद्राने 2008 मध्ये बिजिंगला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय अभिनवने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा प्रकारातही पदके जिंकली आहेत.