आदिवासी वाड्यांचा मालमत्ता कर रद्द करा; आयुक्तांकडे आदिवासी वाडीतील नागरीकांची मागणी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगर पालिकेच्या अंतर्गत असणार्‍या खारघर शहरा मधील हैदरवाडी, फणसवाडी, चाफेवाडी, बेलपाडावाडी, धोमोळेवाडी इत्यादी आदिवासी वाड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या आदीवासी नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पक्की घरे बांधुन देण्यात आली आहेत. ग्रामपंचायत कार्यरत असतांना त्याच्याकडून नाममात्र 250 रूपये घरपट्टी आकारली जायची. परंतु, पनवेल महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर या आदिवासी बांधवांना 20 ते 50 हजार रूपये प्रमाणे मालमत्ता कराची बिले कार्यालयाकडून पाठविण्यात आलेली आहेत. हे अन्यायकारक असून तातडीने पनवेल महानगर पालिकेने आदिवासी वाड्यांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांची अवचित राऊत, अनिल पाटील, शंकर ठाकूर, रामचंद्र देवरे, उत्तम मोर्बेकर, अनिकेत पाटील, प्रेम ठाकूर, रोशन पाटील व खारघर फणसवाडी, हैदरवाडी ,चाफेवाडी व बेलपाडा वाडी येथील आदिवासी बांधव यांनी भेट घेऊन अवाजवी मालमत्ता कर सरसकट रद्द करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version