| पनवेल | प्रतिनिधी |
उत्तराखंडमधील हलद्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर दलित समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पवन चांडक यांना निवेदन दिले. निवेदनात हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर गंगाजल व गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. खरगे हे दलित समाजाचे असल्याने त्यांच्या सभेच्या ठिकाणी अशा प्रकारे ‘शुद्धीकरण’ करणे हे अत्यंत निंदनीय, जातीय व भेदभावपूर्ण कृत्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधित व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 अंतर्गत तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.






