निवडणूक आयोगच बरखास्त करा; ठाकरेंची मागणी

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताना केंंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला असून, तो आयोगच बरखास्त केला जावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आत्ताचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेच ही आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे, पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा सांगितला जाऊ शकत नाही, असं पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं.

आज जी परिस्थिती भाजपाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला तर कदाचित आगामी 2024 ची निवडणूक ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजीत कट होता. शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्मला आलो हे माझं भाग्य आहे. हे त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिंदे गटातर्फे व्हीप
दरम्यान, शिंदे गटही आता आक्रमक झाला आहे. आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात गटाची कोंडी करण्याची व्यूहरचना पक्षाने आखल्याचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी सांगितले. अधिवेशनासाठी आम्ही व्हीप जारी करणार आहोत तो उद्धव ठाकरेंसह सर्वांनाच लागू होणार आहे. जर त्याचे पालन केले गेले नाही तर त्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे गोगावले यांनी सांगितले. विधानभवनातील शिवसेना कार्यालयाचा आम्ही ताबा घेतल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत असलेल्या टीकेवरही भाष्य केले, ते म्हणाले की, संजय उद्धव ठाकरेंना संपवण्याचे चांगलं काम राऊत करत आहे. त्याचं हे काम आम्हाला फायद्याचं ठरत चाललं आहे.

ठाकरेंची याचिका
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देत त्यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केले होते. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात लगेच सुनावणी होऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे ठाकरेंच्या गोटातील वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पवारांकडून आढावा
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालासंदर्भात चर्चा झाली. शरद पवार आणि ठाकरे यांनी कायदेशीर बाबींवर चर्चा केली. यावेळी शरद पवार महाविकास आघाडी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडणार्‍या वकिलांशी चर्चा केली होती. या चर्चेतील कायदेशीर बाबी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाणून घेतल्याची माहिती आहे.

Exit mobile version