मालमत्ता कराचा प्रश्न विधिमंडळात मांडल्याबद्दल आ. जयंत पाटील यांचे आभार

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

मालमत्ता करातून पनवेल पालिका हद्दीतील सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पालिका हद्दीतील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती प्रयत्न करत आहेत. सामान्य पनवेलकरांची ही मागणी मान्य करण्यात यावी आणि पनवेलकरांना करातून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात केली होती. त्याबद्दल पनवेलकरांनी विविध माध्यमातून आ. जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनात बोलताना आ. जयंत पाटील यांनी ही मागणी केली होती. पालिका स्थापनेनंतर नागरिकांना सुरुवातीच्या काळात मालमत्ताकर भरावा लागणार नाही, अशी आश्वासणे राजकीय पक्षांनी मतदारांना दिली होती. प्रत्यक्षात मात्र सत्तेवर येताच भारतीय जनता पक्षातील नेत्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून आले. त्यातच पालिका प्रशासनाकडून नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याने तसेच मालमत्ता कर न भरणाऱ्या करदात्यांवर कारवाई करण्याचे संकेतच प्रशासनाने दिल्याने मालमत्ता करातून दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करत असलेल्या कॉलनी फोरमसारख्या संस्था तसेच इतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, पनवेलकरांच्या मनात प्रशासनाविरोधात निर्माण झालेली खदखद आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या सभागृहात व्यक्त केल्याने सामान्य करदाते समाधान व्यक्त करत आहेत.

खरंच आम्ही भाग्यवान आहोत, असे आमदार लाभले आहेत. भाईंनी कायम जनतेला आणि त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले आहे. प्रत्येक अधिवेशनात त्यांनी मालमत्ता कराचा मुद्दा ठासून मांडला आहे. आणि यापुढे ते हा मुद्दा रेटून नेऊन सामान्य करदात्यांना दिलासा देतील, याची खात्री आहे. राजकारणात नव्याने येणाऱ्या पिढीने अशा लोकप्रतिनिधींना आदर्श मानले पाहिजे आणि शिकले पाहिजे.

अरुण (बापू) साळुंखे,
सचिव, कामोठे कॉलनी फोरम

शेकाप आ. जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील यांनी वेळोवेळी सभागृहात आवाज उठवला होता. आ. जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले आहे. पनवेलमधील नागरिकांच्या निगडित प्रश्नाकडे स्थानिक भाजप आमदार दुर्लक्ष करत असताना शेकापच्या नेत्यांची जनतेशी जोडलेली नाळ अजूनही जोडलेली दिसत आहे. याचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो.

अमोल मुकूंद शितोळे,
अध्यक्ष, शेकाप, कामोठे शहर

माजी नगरसेविका लीनाताई गरड व कॉलनी फोरमच्या खऱ्या कामाचे व पनवेल महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लादलेल्या दुहेरी मालमत्ता कराच्या संघर्षाला वाचा फोडण्याचे काम आ. जयंत पाटील यांनी केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.

अरुण मारुती जाधव,
शहर संघटक, कामोठे कॉलनी फोरम

मागील सात वर्षांपासून जनतेच्या माथ्यावर घोंगावणारा मालमत्ता कराचा प्रश्न विधिमंडळात मांडल्याबद्दल भाईंचे आभार. पनवेलचे विद्यमान आ. प्रशांत ठाकूर पालिका स्थापनेसाठी पुढाकार घेताना पनवेलकरांना पाच वर्षे तरी कर प्रणालीला सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, कर प्रणाली लागू होताच स्थानिक आमदार चिडीचूप झाले आहेत.

महादेव वाघमारे,
अध्यक्ष, परिवर्तन सामाजिक संस्था

मालमत्ता करातून पनवेलकरांना दिलासा मिळावा याकरिता खारघर कॉलनी फोरम आणि माजी नगरसेविका लीना गरड सातत्याने प्रयत्न करते असा उल्लेख करत भाईंनी पनवेलकरांच्या भावना विधिमंडळात मांडल्या. याबद्दल भाईंचे दूरध्वनीद्वारे आभार मानले. भाईंनी जनेतेच्या प्रश्नाला हात घातल्याने मालमत्ता कराचा प्रश्न निश्चित सुटेल अशी अपेक्षा आहे.

लीनाताई गरड, अध्यक्ष, कॉलनी फोरम

जनतेच्या प्रश्नावर भाई नेहमीच सभागृहात भांडत असतात. भाईंनी एखादा मुद्दा हातात घेतल्यावर त्यावर सत्ताधाऱ्यांना नक्कीच विचार करावा लागतो, ही भाईंची दहशत आम्हाला परिचित आहे. पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा मालमत्ता कराचा प्रश्न भाई नक्कीच सोडवतील, हा विश्वास आहे.

रवींद्र भगत, माजी नगरसेवक

आ. जयंत पाटील यांनी मालमत्ता करासंदर्भात प्रश्न उपस्थित करुन स्थानिक आ. प्रशांत ठाकूर यांच्या तोंडावर चपराक मारली आहे. संबंधित मालमत्ता कराचा विषय गंभीर असून, सध्या पनवेल महानगरपालिकेवर प्रशासक असून, 500 स्क्वेअर फूटवाल्या घरांना मालमत्ता करातून सूट द्यावी. जसे मुंबई, नवी मुंबई ह्या ठिकाणी सूट आहे, तसेच पनवेल महानगर पालिका विभागातील नागरिकांपण 500 स्क्वेअर फूट घरांना सूट मिळावी हा विषय सध्याच्या अधिवेशनात मांडून पनवेलच्या नागरिकांच्या मनातले विषय मांडला आहे.

अजित अडसूळे, उपाध्यक्ष, शेकाप
Exit mobile version