| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे कळंबोली प्रभाग क्रमांक 10 चे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त वसाहतीमधिल त्यांच्या कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन रवींद्र भगत यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी भगत नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सांगत मालमत्ता कराविरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, तळोजा येथील वृद्धाश्रमात अन्नदान, 60 वर्षांवरील नागरिकांना चष्मे वाटप, रिक्षा तसेच प्रवासी नाक्याचे उदघाटन या कार्यक्रम दरम्यान करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, शेकडो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.