थळ गुरचरण जागेबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

पूर्वापार वहिवाटीचा मार्ग मोकळा करा, अधिवेशनात मागणी


| अलिबाग | प्रतिनिधी |

थळ – चाळमळा येथील गुरचरण जागेवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करून स्थानिकांच्या पूर्वापार वहिवाटीचा मार्ग बंद केला आहे. याबाबत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी अधिवेशनात आवाज उठवला. अतिक्रमण हटविण्यात यावे.,स्थानिकांसाठी मार्ग मोकळा करावा अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे लवकरच चाळमळा येथील मार्ग स्थानिकांसाठी मोकळा होण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील चाळमळा येथील सर्व्हे नंबर 345 /1 मधील गुरचरण जागेमधून ये – जा करण्यासाठी बागायतदार व स्थानिक ग्रामस्थांची पूर्वीपासूनची वहिवाट आहे. या जागेचा वापर गुरे चरण्यासाठी स्थानिक करीत आहेत. मात्र या जागेभोवती ग्रामपंचायतीने तारेचे कुंपण बांधलेे. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. मात्र पोलिसांच्या मदतीने ग्रामपंचायतीने स्थानिकांना अडविले. गुरचरण जागेलगत असलेल्या बंगलेवाल्यांनी नारळाची झाडे लावून त्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे स्थानिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. याबाबत शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत आवाज उठवला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. अतिक्रमण झालेला मार्ग तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी यावेळी आ. जयंत पाटील यांनी केली.

ऐनघरमध्ये विकासकामाच्या नावाखाली लाखोचा अपहार

रोहा तालुक्यातील ऐनघर गावात रस्ते, गटार, पाणीपुरवठा सारख्या अनेक योजना केवळ कागदोपत्री दाखविण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात गावात विकासाचे काम झाले नाही. सुमारे एक कोटी 25 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी यावेळी केला. ऐनघर गावात विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची कबूली मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. शेकापचे आ. जयंत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र तो अपहार 19 लाख 19 हजार 669 इतक्या रुपयांचे झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत दोषींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दोषी कर्मचारी चिपळूणकर यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली असून तत्कालीन ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version