शासकीय वसतिगृहाचे गृहपाल गैरहजर; विद्यार्थ्यांचे हाल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत येथे शासनाचे आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहात राहून उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यांची तयारी हे विद्यार्थी करीत असतात. मात्र, त्याच वसतिगृहातील गृहपाल हे नियुक्ती झाल्यापासून वसतिगृहाकडे फिरकत नाहीत. दरम्यान, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच अन्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

कर्जत येथे अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. तेथे निवास करून हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतात. त्यात राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि अन्य स्पर्धा परीक्षा यांची तयारीदेखील हे विद्यार्थी प्रमुख्याने करीत असतात. 110 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असलेल्या या आदिवासी वसतिगृहामध्ये रायगड, ठाणे, नाशिक, पुणे, पालघर या जिल्ह्यातील विद्यार्थी निवास करून आहेत. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन येथील गृहपाल यांच्याकडे आदिवासी विकास विभागाने दिले आहे. मात्र, त्या ठिकाणी गृहपाल खोडके हे वसतिगृहाकडे नियुक्तीवर असूनदेखील फिरकले नाहीत. त्यामुळे गेले काही महिने येथे निवास करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्याचवेळी विद्यार्थ्यांची विचारपूस करायलादेखील त्यांना वेळ नसते. परिणामी, सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी यांना पत्र लिहून गृहपाल म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी करणारे निवेदन पाठवले आहे.

दरम्यान, विद्यार्थी निलेश कोरडे, देवेंद्र मेंगाळ, राज उघडे, जयेश सोंगाळ, ज्ञानेश्वर सांबरी, ओमकार सराई, किरण हिंदोळा, विनायक कडाळे, विवेक वाघमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव तसेच आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष सुनील तातोडकर यांना पात्र पाठवले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात जुने गृहपाल तुषार गावित यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तर गावित हे विद्यार्थ्यंसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित कार्याचे, याच ठिकाणी रहायचे आणि स्पर्धा परीक्षा यांच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बाहेरून एक्सपर्ट बोलावून घ्यायचे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असल्याने कर्जत आदिवासी वसतिगृह नव्या चर्चेत आले आहे.

आमदारांचे आश्वासन
कर्जत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

Exit mobile version