| मुंबई | प्रतिनिधी |
कुख्यात गूंड अबू सालेमने मोठा भाऊ अबू हाकिम अन्सारीच्या निधनानंतर तातडीच्या पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन मंगळवारी (दि.6) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
अबू सालेमचा मोठा भाऊ अबू हाकिम अन्सारीचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. मोठा भाऊ आपल्यासाठी पितृतुल्य होते. त्याच्या चाळीसाव्या दिवसाच्या विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी, कुराण पठणात भाग घेण्यासाठी तसेच कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी अबू सालेमने उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे जाण्याची परवानगी मागितली आहे. त्याच्या अर्जावर मंगळवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजित भोसले यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी अर्ज वेळेत दाखल करण्यात आला होता; परंतु न्यायालयीन सुट्ट्यांमुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही, अशी माहिती सालेमकडून न्यायालयाला देण्यात आली. तथापि, मुस्लिम परंपरेनुसार 40 दिवसांचा कालावधी उलटल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले, तरीही सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली. भावाच्या मृत्यूनंतर, सालेमने 1 डिसेंबर रोजी मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीच्या पॅरोलसाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्याला पोलीस बंदोबस्तासह पॅरोलही मंजूर करण्यात आला; परंतु त्याबाबतचा खर्च उचलण्यास सालेम सक्षम नसल्याचे सांगण्यात आले होते.






