आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांची रेलचेल

| पनवेल | प्रतिनिधी।

उद्या आषाढी एकादशी असल्याने पनवेल शहरातील भाजी मार्केटमध्ये उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विठ्ठल भक्तांसह अनेक नागरिक एकादशीचा उपवास करणार असल्याने रताळी, शेंगा, बटाटे, रताळ्याची पाने तसेच इतर उपवासासाठी उपयोगी भाजीपाला खरेदीसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाला आहे.

सकाळपासूनच बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली असून, विक्रेत्यांनीही खास उपवासासाठी लागणाऱ्या ताज्या भाज्या व कंदमुळे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विशेषतः रताळी आणि शेंगांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. महिलांनी कुटुंबासाठी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करताना बाजारात चांगली गर्दी केली. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी मागणी वाढल्याने रताळी व शेंगांच्या दरातही किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक मंदिरात जाणार असून, घरोघरी उपवासाचे धार्मिक वातावरण असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये उपवासाच्या साहित्याची खरेदी दिवसभर सुरू राहिली. विक्रेत्यांनाही या दिवशी चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Exit mobile version