| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून, घराघरांत घटस्थापना करून देवीचा जागर सुरू होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या भाजी बाजारातही लगबग वाढली असून, उपवासासाठी आवश्यक असलेल्या विविध भाज्या आणि कंदमुळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. नवरात्रातील नऊ दिवस अनेक भाविक उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या रताळी, शेंगा आणि विविध कंदमुळांना विशेष मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन पनवेल भाजी मार्केटमध्ये विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर मालाची आवक करून ठेवली आहे.
सध्या बाजारात रताळी आणि विविध प्रकारची कंदमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. उपवासाच्या आहारात रताळ्याला विशेष महत्त्व असल्याने ग्राहकांकडून त्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचबरोबर उपवासासाठी लागणाऱ्या इतर भाज्यांचीही मागणी वाढली आहे. नवरात्र सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच महिला वर्गाने उपवासाच्या साहित्याची खरेदी सुरू केली आहे. घरातील नवरात्राची तयारी, घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य आणि उपवासासाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात केवळ धार्मिक वातावरणच नव्हे, तर बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सकाळपासूनच भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असून, विक्रेतेही वाढत्या मागणीसाठी सज्ज झाले आहेत. उपवासासाठी रताळी, कंदमुळे यांच्यासोबत साबुदाणा, भगर, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ आणि इतर उपवासाचे पदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे नवरात्राच्या सुरुवातीपासूनच या पदार्थांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.







