पालकांसह आरोपीला अटक
। रसायनी । वार्ताहर ।
पोटच्या मुलीचे आरोपींकडून लैंगिक शोषण होत असतानादेखील पालकांची मूकसंमती असल्याचा प्रकार रसायनीत उघड झाला आहे. पीडित मुलीने धैर्य दाखवून तक्रार दाखल केल्याने आरोपी निर्मल चौधरी (रा.त्रिपुरा) याच्यासह पीडित मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली.
पीडितेचे कुटुंब कराडे खुर्द गावचे असून बेलेंत्रा सोसायटीमध्ये, त्यांनतर काही काळ पावणे गाव तुर्भे येथे वास्तव्यास होते. पीडिता 14 वर्षांची अल्पवयीन असल्यापासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. निर्मल चौधरी हा पीडित मुलीच्या आईचा मित्र होता. जुलै 2022 पासून आरोपीने पीडितेवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, त्याने पीडितेच्या मोबाईलवर स्वतःचे अश्लील व्हिडीओ पाठविले. या सर्व प्रकारास पीडितेच्या आई व वडिलांनी प्रोत्साहित केले. पीडितेने सर्व प्रकार असह्य झाल्यावर रसायनी पोलिस ठाणे गाठत निर्मल कुमार आणि आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर करीत आहेत.