वातानुकूलित प्रवासाचे भाडे घेऊनही सुविधांचा अभाव
एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशी वर्गात नाराजी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, म्हणून अलिबाग-पनवेल मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरु करण्यात आली. परंतु, आता शिवशाहीचा प्रवास डोकेदूखी बनत आहे. वातानुकूलित प्रवासाचे भाडे घेऊन सुविधांचा अभाव असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. त्याचा अनुभव मंगळवारी सायंकाळी पनवेलहून अलिबागकडे प्रवास करताना प्रवाशांनी अनुभवला. एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजीचे सूर प्रवासी वर्गाकडून उमटत आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबीवली, बोरीवली अशा अनेक मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या निश्चितस्थळी वेळेत पोहचता यावे, यासाठी अलिबाग ते पनवेल विना थांबा शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली. दर पाऊस तासाने ही बस सेवा प्रवाशांसाठी चालविली जाते. कमी वेळेत पनवेलमध्ये थेट पोहचता येत असल्याने या शिवशाहीला प्रवाशांकडून मागणी अधिक आहे. परंतु शिवशाहीचा प्रवास सध्या डोकेदूखी ठरत असल्याचे बोलले जात आहे. पनवेल – अलिबाग ही विना थांबा शिवशाही बस सायंकाळी अलिबागकडे जात होती. एसटीत बसलेले प्रवासी बसमधून प्रवास करीत होते. दरम्यान वातानुकूलित बसला अचानक गळती लागणे. एसीचे बटण तुटणे, अशा अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागला. एमएच 06 बी. डब्लू 3367 या क्रमांकाची ही शिवशाही बस असून महामंडळाच्या कारभाराबाबत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.






