| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील एका सोळा वर्षांच्या मुलीसोबत पाँडेचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीसाठी पाँडेचेरी येथे कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेली मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती पाँडेचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली. मात्र तिची स्थिती पाहताच सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेत सापडलेल्या मुलीला जेआयपीएमईआर रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलीच्या आईने 31 ऑक्टोबर रोजी ग्रँड बाजार पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कौटुंबिक वादातून मुलगी एका दिवसापूर्वीच घरातून निघून गेली होती. दोन दिवसांनंतर ही मुलगी समुद्रकिनाऱ्याजवळ अत्यंत अशक्त अवस्थेत सापडली. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की ही मुलगी एका ऑटो रिक्षात बसली होती. जी काजा मोहिद्दीन नावाचा व्यक्ती चालवत होता. तिने सुचवलेल्या स्थळी नेण्याऐवजी मोहिद्दीनने तिला गेस्ट हाऊस आणि नंतर त्याच्या घरी नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने मुलीला ऑरोविल येथे सोडले. त्यानंतर मुलीने चेन्नईला जाणाऱ्या पर्यटकांच्या गटाकडून लिफ्ट मिळवण्याचा प्रयत्न केला, जिथे तिला तिच्या मित्राला भेटायचे होते. मात्र, पर्यटकांनी मुलीला एका खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला दोन दिवस खोलीत ओलीस ठेवले आणि नंतर टॅक्सी बुक करून तिला पुद्दुचेरीला परत पाठवले. ग्रँड बाजार पोलिसांनी आंध्र प्रदेशातील एक आणि ओडिशातील दोन व्यक्तींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य तीन गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.