| केज | वृत्तसंस्था |
मूकबधिर असलेल्या एका 43 वर्षीय महिलेवर, गावातील एकाने अत्याचार केल्याची घटना (दि.7) रोजी घडली. याप्रकरणी एकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात एक जन्मतः मूकबधिर असलेली अविवाहित महिला आई- वडिलांकडे राहते. सोमवारी आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. ती मूकबधिर महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून त्यांच्या भावकीतील एकाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला. तिच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने तिच्या चुलतीने घरात जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.8) पीडित महिलेच्या चुलतीच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.