| धुळे | वृत्तसंस्था |
शहरालगत नगावबारी परिसरातील मुंबई- आग्रा महामार्गावरील एका महाविद्यालयाजवळ मिनी ट्रक, टेम्पो आणि एसटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात कंडक्टरचा समावेश असून बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी (दि.9) रात्री नऊनंतर घडली. महामार्गावर बंदस्थितीत मिनी ट्रक उभा होता. त्याला नेण्यासाठी टेम्पो अर्थात टोचण वाहन मागविण्यात आले. मिनी ट्रकमधून ऑक्सिजनचे सिलिंडर टोचण वाहनात टाकले जात होते. या वाहनांचा एसटी चालकास अंदाज आला नाही. त्यामुळे एसटीने मागून धडक दिल्यानंतर कंडक्टरच्या खिडकीची काच फुटून बाहेर पडला आणि तो एसटीच्या चाकाखाली येऊन ठार झाला. धडकेमुळे समोरील वाहनांमधील दोघांचाही मृत्यू झाला. कंडक्टर नरेंद्र पाटील, टोचण वाहनाचे कर्मचारी शिवराज पावरा, सुभाष सुडके यांचा घटनेत मृत्यू झाला. एसटी धुळ्याकडून शिंदखेड्याकडे जात असताना अपघात झाला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. या घटनेत बसमधील सात ते आठ जण जखमी झाले. त्यांच्यासह एसटी चालक रिंकू गोसावी यांच्यावर जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.