शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
| धुळे | प्रतिनिधी |
सध्या देशापुढे महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा हमीभाव अशा अनेक समस्या असताना सरकार शेतकर्यांच्या हिताच्या विरोधात धोरण राबवत आहे. अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर झाल्याची उदाहरणे दिसून येतात. सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते. पण सत्तेचा माज डोक्यात गेल्यानंतर त्याचा गैरवापर सुरू होतो. असा उन्माद चढलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेला करावे लागेल, असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी केले. शिंदखेडा येथे रविवारी (दि.15) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महायुतीवर हल्लाबोल करीत चांगलाच समाचार घेतला.
पवार पुढे म्हणाले की, शिंदखेडा हा कष्टकरी शेतकरी यांचा परिसर आहे. शेतीमध्ये इमान राखून कष्ट करायचे. त्यावर आपला संसार चालवण्याचे काम या तालुक्यातील जनता करते. पण, अलीकडच्या काळात राज्यकर्ते शेतीसंबंधात आस्था ठेवत नाही. सरकारची अनेक धोरणे ही शेतकरी हिताची नाहीत. कांदा हे शेतकर्याचे महत्त्वाचे पीक आहे. तर सामान्य जनतेचे खाद्यदेखील आहे. परंतु, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी कांद्याच्या संदर्भात चुकीची धोरणे राबवली. शेतकर्यांनी पिकवलेला कांद्याला अपेक्षित भाव मिळावा, ही त्यांची रास्त मागणी आहे. पण सरकारने निर्यात बंदी करून शेतकर्यांना अडचणीत आणले. ऊस उत्पादक शेतकर्यांनादेखील अशाच पद्धतीने अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे. त्याचप्रमाणे गहू आणि तांदूळ या उत्पादनासंदर्भातदेखील शेतकरी हिताच्या विरोधात धोरणे घेतली. शेतकरी हा पिकवता धनी आहे. मात्र, त्याच्या पिकाला किंमतच मिळू द्यायची नाही, हे मोदी सरकारचे धोरण आहे. हे सरकार बळीराजाच्या विरोधात आहे. आपणदेखील दहा वर्ष देशाचे शेतीचा कारभार पाहिला. कृषी मंत्रीपदाची जबाबदारी असताना अमेरिकेतला गहू भारतात आणण्याचा विषय माझ्यासमोर आला. त्यामुळे मला दुःख झाले. मी शेतकरी परिवारातला आहे. हा देश बळीराजाचा देश आहे. या देशात परदेशातून अन्न आणावे लागते, ही बाब मनाला पटत नव्हती. पण हे आव्हान स्वीकारले. आम्ही गहू, तांदळाला दाम दिला. तसेच शेतकर्यांची संदर्भात योग्य धोरण राबवले. त्यामुळे 2014 मध्ये भारत हा जगात गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश झाला. हे सर्व बळीराजाच्या साथीमुळेच शक्य होऊ शकले. याच कालावधीमध्ये शेतकर्यांच्या आत्महत्या संदर्भात आपण सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले. शेतकर्यांवर 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज सावकाराच्या कर्जामुळे होते. ही बाब निदर्शनास आल्यानेच आपण कर्जमाफी केली. असे करत असताना वेळेवर कर्ज फेडणार्या शेतकर्यांना देखील आपण सवलत देण्याचे काम केले. पण सध्याचे सरकार हे शेतकर्यांच्या विरोधात धोरण राबवत आहे, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.
सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांकडे सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो. सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. ती सत्ता उद्या महाविकास आघाडीच्या हातात देणं हे काम तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही राज्य हातामध्ये द्या, महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही.
– शरद पवार