गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार

| डोंबिवली | प्रतिनिधी |

कल्याणमध्ये राहणार्‍या एका 23 वर्षीय युवतीला नाश्त्यासह सरबतामध्ये गुंगीचे द्रव्य टाकून अत्याचार करणार्‍या प्रवीण पान्हेरकर (42, देवीचा पाडा, पश्‍चिम डोंबिवली) याच्या विरोधात पीडित युवतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपीला अटक केली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर फेब्रुवारी ते नोव्हेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत सदर इसमाने सतत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

यासंदर्भात पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तिने आपल्याला नाश्ता खाऊ घातल्यानंतर गुंगीचे द्रव्य टाकून सरबत पिण्यास दिले. त्यानंतर संबंधिताने अत्याचार केले. तसेच व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर सतत अत्याचारामुळे युवती गर्भवती राहिली. याबाबत वाच्यता केल्यास युवतीच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी आरोपीने केली असल्याचे युवतीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीचे दोन विवाह होऊनही त्याने युवतीसोबत संबंध प्रस्थापित केले व युवतीसोबत विवाह करण्याबाबत सांगितले. फसवणूक झाल्याने युवतीच्या तक्रारीनुसार प्रवीण पान्हेरकर (42) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने अधिक चौकशीसाठी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. लोखंडे अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version