100 विद्यार्थी प्रवेशाकरिता मिळाली परवानगी
पालकमंत्री अदिती तटकरे यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणार्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती.
त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी केंद्र शासनाने 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी विहीत अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने या वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 100 विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय दि.3 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. यातील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (जि. रायगड) या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार 100 इतकी राहील. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्निकरण प्राप्त करुन घेण्यात यावे व तद्नंतर प्रवेश करण्यात यावेत. राज्य शासन / केंद्र शासन/ सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी. केंद्र शासन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत वेळोवेळी केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशीत करण्यात येऊ नये. केंद्र शासनाने दिलेली परवानगी ही सन 2021-22 वर्षाकरिता असून तद्नंतर या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करुन घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार विद्यार्थी प्रवेश करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या तसेच त्याआधारे राज्य शासनाच्या परवानगीचे नूतनीकरण करुन घेणे बंधनकारक राहील.
लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्यक्ष प्रवेश प्रकिया सुरू होणार असून रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.