। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर 4 जानेवारीपासून पुन्हा एकदा गोळीबाराचा सराव करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस मुख्यालयातून मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीला पत्र देत ग्रामस्थांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र या पत्रात निश्चित वेळ आणि कधीपर्यंत सदर सराव करण्यात येणार आहे याबाबत कसलीही माहिती देण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे. सफेद कांद्याचे तसेच तोंडली व अन्य भाजीपाल्याच्या ऐन हंगामात ही नोटीस बजावल्याने शेतात कसे जायचे असा प्रश्न ग्रामस्थ तसेच महिलांना पडला आहे.
पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने सरावासाठी परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. हे मैदान कुलाबा जिल्हा अस्तित्वात असानाच पोलीस विभागाने निर्माण केले होते. सध्या याच सराव मैदानावर राज्यातील पोलीस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. अनेकदा या मैदानावरुन कार्ले गावात गोळया येऊन पडल्या आहेत. काही वेळा तर ग्रामस्थांच्या अगदी जवळून गोळया गेल्या आहेत. अनेक घरांच्या भिंतींमध्ये गोळया शिरल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना साकडे घातले होते. त्यानुसार पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला जयंत पाटील यांनी सुचना देत ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी सदर गोळीबार मैदान सुरक्षित स्थळी हलवा किंवा संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेऊन नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र नुकतेच पोलिस मुख्यालयातून मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीला पत्र देत 4 जानेवारीपासून गोळीबाराचा सराव सुरु करण्यात येणार असल्याचे कळवून गावात दवंडी देण्याची सुचना करण्यात आली आहे. मात्र या पत्रात सरावाची निश्चित वेळ व मुदत दिली नसल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.
कार्ले गावात मोठ्या प्रमाणात सफेद कांद्याचे तसेच तोंडली व अन्य भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. रोजगारासाठी गावातील अनेक महिला पाणी देण्यासाठी शेतात जातात. मात्र सरावादरम्यान कोणताही अपघात होऊ नये, याकरीता घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. परिणामी रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीबरोबरच संतापाचे वातावरण पसरले आहे.
सराव करताना ग्रामस्थांना निश्चित वेळ व कालावधी सांगणे आवश्यक होते. मात्र पोलीस विभागाकडून केवळ दिवस सांगण्यात आला. यापुर्वी सरावादरम्यान अनेक अपघात झाले आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये. नागरिकांच्या सुरक्षततेसाठी आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे संरक्षण भिंती उभारण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. सरावाला विरोध नाही, मात्र त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होत असेल, तर विरोध आहे.
जयेश पाटील, ग्रा.पं.सदस्य तथा माजी सरपंच, कार्ले