बंदरांवर 150 सीसीटीव्हींची करडी नजर; नागरीकांसह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे पाऊल
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील प्रमुख बंदर आणि पोर्ट परिसरात तब्बल दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, संशयास्पद हालचालींवर आता रात्रंदिवस लक्ष ठेवले जात आहे.
औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात विविध मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. गेल आणि आरसीएफच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांचे काम सुरू असून रोजगारासाठी राज्यभरातून तसेच परराज्यातून कामगारांचा ओघ वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी बंदर परिसरात कडेकोट नजर ठेवली आहे.
दुसरीकडे, रायगड जिल्हा पर्यटनासाठीही प्रसिद्ध असल्याने अलिबाग, मांडवा, नागाव, मुरूड, काशीद, श्रीवर्धन यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्षभर लाखो पर्यटक भेट देतात. गेटवेमांडवा आणि भाऊचा धक्कामांडवा या सागरी मार्गांवरही मोठी गर्दी असते. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत समुद्रकिनारे, जेट्टी आणि पोर्ट परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात धरमतर पोर्टवर 51, दिघी पोर्टवर 21, मांडवा जेट्टीवर 24, सानेगाव जेट्टीवर 16 तर इतर ठिकाणी लहान प्रमाणात कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या सीसीटीव्ही नेटवर्कमुळे बंदर, किनारे आणि पोर्ट परिसरातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष राहणार असून संभाव्य धोके टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील पर्यटकांसह नागरीकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांसह लॅन्डींग पॉईंट आणि बंदराच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने किनाऱ्यांसह बंदर, पोर्टच्या परिसरातील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. या प्रणालीमुळे प्रत्येक संवेदनशील ठिकाणावर रिअल-टाइम नजर ठेवता येणार आहे.
महत्वाची ठिकाणे
धरमतर पोर्ट: 51
दिघी पोर्ट: 21
मांडवा जेट्टी: 24
सानेगाव जेट्टी: 16
इतर ठिकाणे: 38
पोलिसांची भूमिका अधिक सक्रिय
सीसीटीव्ही नेटवर्कच्या मदतीने संशयास्पद हालचाली, बेकायदेशीर प्रवेश, तसेच किनारी भागातील अनधिकृत घडामोडींवर तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. यामुळे केवळ पर्यटकच नाही तर बंदरांवरील व्यापारी आणि औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे. पोलीस प्रशासनाच्या मते, ही यंत्रणा भविष्यात आपत्ती व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.






