आमदार राजन साळवी यांची एसीबीने केली आठ तास चौकशी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे बुधवारी (दि.२२) अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. यावेळी आमदार साळवी यांची सुमारे आठ तास अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यापूर्वी आमदार साळवी यांची १४ डिसेंबर व २० जानेवारी रोजी तर त्यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांची ३ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती.

आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेच्या चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक असून चौकशीला घाबरत नाही असे स्पष्ट करीत आमदार साळवी हे या चौकशीला सामोरे गेले. तसेच त्यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले. त्यांच्यासह कुटुंबीयांकडे असलेल्या मालमत्तेची माहिती त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच आपल्याकडे संशय घेण्याइतपत बेकायदा मालमत्ता नसल्याचे सांगितले होते. २० जानेवारी रोजी तपासिक अधिकारी यांनी आमदार साळवी यांना मालमत्तेविषयक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आमदार राजन साळवी बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजार राहिले. यावेळी सुमारे आठ तास अधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांची चौकशी केली.

दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला होता. खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आली होती.

Exit mobile version