। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात आज सकाळपासून एसीबीची छापेमारी सुरु आहे. एसीबीने आज (दि.18) सकाळी राजन साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर धाड टाकली. त्यानंतर त्यांच्याविरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीकडून गेल्या 8 तासांपासून राजन साळवी यांच्या घरी झाडाझडती सुरु आहे. असं असलं तरी राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस कस्टडीत राहण्याची माझी तयारी आहे, असं राजन साळवी म्हणाले आहेत.
पूढे ते म्हणाले “आतापर्यंत माझ्या चार ठिकाणच्या प्रॉपर्टीचं मोजमाप झालेलं आहे. आता माझ्या मूळ घरात अधिकाऱ्यांची टीम आहे. त्यांच्याकडून झाडाझडती सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होईल, असं वाटतं. पण मला ठोस माहिती नाही. पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी, माझी पत्नी आणि माझ्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे”, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.
छापेमारीबद्दलच आक्षेप “माझा छापेमारीबद्दलच आक्षेप आहे. छापेमारी करायला मी गुंड आहे का? ही चौकशी आहे. मी सामोरं जातोय. जे व्हायचं ते होईल. ते त्यांची कायदेशीर कारवाई करणार आहेत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. माझे सहकारी जामीनासाठी न्यायालयात अर्ज करतील. मला न्यायालयात निश्चित न्याय मिळेल. मला ताबोडतोब जामीन मिळेल, असं वाटतं”, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.