| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ-कशेळे रस्त्यावरील वाकस गावातील रस्त्याचे काँक्रिटकरण केले जात आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यातून वाहतूक करताना मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यात काँक्रिटकरण केले नसल्याने रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनचालक संतप्त झाले होते. दरम्यान, गेली महिनाभरात रस्त्यावर काँक्रिटचे काम वेगाने सुरू असून, काही दिवसात गावातील रस्त्याचे काँक्रिटकरण पूर्ण होणार आहे.
वाकस गावातील रस्त्याचे 200 मीटर अंतराने काँक्रिटकरण काम मंजूर होते. मात्र, संबंधित रस्त्यावर ठेका मिळविणाऱ्या ठेकेदार कंपनीने काँक्रिटकरणाचे काम पावसाळा सुरू होण्याआधी सुरू केले नव्हते. त्यामुळे पावसाळाभर या भागातील खड्डे हे वाहनचालक यांच्यासाठी त्रासदायक ठरत होते. वाकस गावात या रस्त्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. त्यात हा रस्ता साडे पाच मीटर रुंदीचा बनणार असल्याने स्थानिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या रस्त्यावर बांधकाम खात्याकडून डांबरीकरण केले जात असताना वाकस गावातील कार्यकर्ते आणि बाजार समितीचे संचालक संतोष वैखरे यांनी कायम लक्ष ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या वाकस गावातील सिमेंट काँक्रिट कामाबद्दल स्थानिकदेखील जागरूक असल्याचे दिसून येत आहेत.
रस्त्यावर काँक्रिट करताना सिमेंट आणणारे आरएमसीमधील साहित्य बरोबर आहे की नाही तसेच पाणी व्यवस्थित मारण्यात येते की नाही तसेच कामे नियमानुसार होतात की नाही यावरदेखील देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण हे चांगले दर्जाचे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







