अलिबाग-रोहा-तळा रस्ते कामांना वेग द्या

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश

| मुंबई | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा-तळा या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देऊन पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बुधवारी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

रायगड हा राज्यातील प्रमुख पर्यटन जिल्हा मानला जातो. अलिबाग, रोहा, तळा तसेच परिसरातील पर्यटनस्थळांना दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या भागातील रस्ते अधिक सुरक्षित, सक्षम आणि सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे मंत्री भोसले यांनी नमूद केले. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस खा. सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शरद राजभोज, उपसचिव शैलेश बोरसे, कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक, उपविभागीय अभियंता विजय बागुल, उपअभियंता दिनेश पराते यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अलिबाग-रोहा-तळा हा 85.60 किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण रस्ता एचएएम पॅकेज-01 अंतर्गत विकसित केला जात आहे. या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सध्या सुमारे 64 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.
बैठकीदरम्यान रस्त्याच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पातील प्रलंबित कामे, वाहतूक व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, रोहा आणि तळा परिसरातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

Exit mobile version