कोयना प्रकल्पाच्या खाजगीकरणाला वेग

ग्राहकांना लागणार वीज दरवाढीचा शॉक
। मुंबई । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना प्रकल्पाच्या टप्पा तीन आणि कोयना धरण पायथा विद्युत ग्रह याचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाजनको कंपनीचे खासगीकरण झाल्यास राज्यात विजेचे दर भरमसाट वाढण्याची शक्यता असून, परिणामी ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.
चाळीस वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने योजना आणली आहे. खासगी कंपन्यांमार्फत या प्रकल्पाचे बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरण करून वीज निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील एकूण 27 वीज प्रकल्पांचे खासगीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये महाजनकोच्या अखत्यारितील कोयना प्रकल्पाच्या अलोरे येथील टप्पा 3 आणि कोयना धरण पायथा वीज ग्रह यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती होणार्‍या विजेसाठी 21 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. महाजनकोने कोयना प्रकल्प जलसंपदा विभागाकडून भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा खर्च आणि भाड्याची रक्कम अशा एकूण 1 रुपये 21 पैसे या दराने महाजनको कंपनी महावितरण कंपनीला वीज देते.
औष्णिक प्रकल्पातून मिळणार्‍या विजेचा खर्च प्रति युनिट अडीच ते तीन रुपये इतका आहे; मात्र महावितरण कंपनी घरगुती आणि व्यावसायिक लोकांसाठी वेगवेगळे दर आकारते. 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या घरगुती ग्राहकांसाठी महावितरणचा साडेतीन रुपये तर व्यावसायिक ग्राहकांसाठी सात रुपयेपर्यंत दर आहे. मात्र सरासरी महावितरणचा दर हा साडेचार रुपये प्रति युनिट आहे.
महाजनकोचे वीज निर्मिती प्रकल्प खासगी कंपन्यांकडे गेल्यानंतर त्यांचा वीज उत्पादन खर्च हा सरासरी अडीच ते तीन रुपये प्रति युनिट त्या दरम्यान असेल. कारण त्यामध्ये कंपनी ही आपल्या नफ्याची रक्कम ही समाविष्ट करेल. त्यामुळे आपोआपच विजेचे दर वाढून सर्वसामान्य आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

महाजनकोचे अस्तित्व संपले तर खासगी कंपन्यांना वीज निर्मिती क्षेत्रात स्पर्धक राहणार नाही आणि त्यातून खासगी कंपन्या मनाला वाटेल, त्या पद्धतीने विजेचे दर आकारतील. त्याचा त्रास सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागेल. त्यामुळे कोयना प्रकल्पाचे खासगीकरण होऊ नये, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी लढा उभारला आहे. – संतोष घाडगे, केंद्रीय कोषाध्यक्ष कामगार संघटना

Exit mobile version