पनवेल पालिका क्षेत्रात लसीकरणाला गती

महानगरपालिकेने ओलांडला 5 लाख लसीकरणाचा टप्पा
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेने पाच लाख कोव्हिड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आत्तापर्यंत शासकीय लसीकरण केंद्र आणि खासगी लसीकरण केंद्रावरती एकुण 5 लाख 1 हजार 416 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तसेच लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्यात येत आहेत. तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, दुसर्‍या टप्प्यांमध्ये पहिल्या फळीवर काम करणारे कर्मचारी, तिसर्‍या टप्प्यांमध्ये 60 वर्षावरील तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दिनांक 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती. आज अखेर पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण पाच लाख लसीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या पालिका क्षेत्रात एकुण 28 शासकीय आणि 77 खाजगी लसीकरण केंद्राना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय केंद्रावर रोज लसींच्या उपलब्धतेनुसार 100 ते 200 कुपन्सचे वाटप केले जात आहे. आजवर 2246 सत्रे आयोजित करण्यात आली असून रोज सरासरी 3900 डोस नागरिकांना दिले जातात. सद्य स्थितीत लस पुरवठा मुबलक प्रमाणात होत असल्याने दररोज पाच हजाराहून अधिक लसीचे डोस नागरिकांना दिले जात आहेत.

Exit mobile version