पोखरवाडी सोंडेवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर तालुक्यातील पोखरवाडी सोंडेवाडी येथील धबधब्यावर पर्यटकांना पाण्यात उतरू नये, अशा विनंती बंदीचा बॅनर खालापूर पोलिसांच्या मार्फत स्थानिक पोलीस पाटील यांनी लावला आहे.

शुक्रवारी ( दि.21 ) मुंबई येथून पावसाळी ट्रेक आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी 18 ते 26 वयोगटातील 37 मुले मुली सोंडेवाडी येथून ट्रेक करून आल्यावर मोरबे धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या व माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या या पोखरवाडी-सोंडेवाडी बंधार्‍यावर दुपारी पोहण्यासाठी उतरली असता यातील आकाश धर्मदास माने, रणथ मधू बंदा, एकलव्य उमेश सिंग आणि ईशान दिनेश यादव यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या चौघांच्या मृत्यूची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हा पोखरवाडी सोंडेवाडी धबधबा सदृश्य तलाव अतिशय धोकादायक असून येथे पाण्याचा भोवरा तयार होतो. त्याच्या जवळपास गेल्यावर, जाणार्‍याचा मृत्यु अटळ आहे, असे स्थानिक ग्रामस्थाांकडून समजते. येथे स्थानिक तरुण, तरुणी किंवा स्थानिक पर्यटक कधीच जात नाहीत. सन 2021 या वर्षी 3, सन 2022 या वर्षी 1 तर सन 2024 या वर्षी म्हणजे अद्याप पावसाळा सुरू झाला नाही, तरीही चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या चार वर्षांत आठ जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. या तलावाच्या ठिकाणी येण्याचा मार्ग एकच असला तरी वाटा अनेक आहेत, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग आणि पोलीस पाटील हे वारंवार विनंती करून देखील बेफिकीर पर्यटक कुणाचेच ऐकत नाहीत, आणि शेवटी मृत्यूच्या दाढेत जातात, असे निराश होऊन खालापूर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील यांनी सांगितले. अद्याप पर्यटकांना कायदेशीर येण्यावर बंदी घालण्यात आली नाही, पण येणार्‍या पर्यटकांनी आपला आनंद साजरा करताना स्थानिक यंत्रणेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस पाटलांनी केले आहे.

Exit mobile version