अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सिंधुदुर्गातून लोणावळा येथे दुचाकीवरून जात असलेल्या इसमाचा पेण तालुक्यातील गडब येथे रस्त्यात आलेल्या गतिरोधकावर वेग कमी करण्यासाठी ब्रेक मारल्याने गतिरोधकावरून मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडून त्याच्या डोक्याला मार बसला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भूषण दतात्रेय साईल वय-32 वर्ष रा. पनदुर ता. कुडाळ जि सिंधुदुर्ग असे या इसमाचे नाव आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 17 जुलै 2021 रोजी 11:30 वा. सुमारास सदर इसम सिंधुदुर्ग ते लोणावळा असा मोटार सायकल वरून प्रवास करीत होता. मौजे गडब येथे तो आला असता रस्त्यात आलेल्या गतिरोधकावर वेग कमी करण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने गतिरोधकावरून मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे तो दुचाकी सह खाली पडून त्याचे डोक्यावर उजवे बाजूस व पोटास मार लागला. त्याला उपचाराकरिता पेण उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे मोटार अपघात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार टेमकर हे करीत आहेत.





