महाड शहर स्वच्छतेसाठीदेखील 50 लाखांचा निधी उपलब्ध
रायगडच्या पालकमंत्री. अदिती तटकरे यांची माहिती
पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर शहरातील महाबळेश्वर रस्त्यावरील नगरपंचायतीच्या जुन्या नळपाणी पुरवठा योजनेची जॅकवेल वाहून गेल्याने महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण ठोक तरतुदीतून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
पोलादपूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शहरात पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले असून ग्रामपंचायतीच्या काळात जुनी नळपाणी पुरवठा योजना व विस्तारित पाणी पुरवठा योजना या दोन्ही योजना कार्यान्वित करण्यात आल्या.
यापैकी विस्तारीत नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा फिल्टरेशन प्लांट अद्याप पुर्ण झाला नसल्याने योजना अद्याप नगरपंचायतीकडे वर्ग झाली नाही. अशातच, महाबळेश्वर जुन्या नळपाणी पुरवठा योजनेची जॅकवेल गेल्या गुरुवारी सायंकाळी अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पुरात वाहून गेली. याच रात्रीपासून पोलादपूर तालुक्याचा विद्युतपुरवठा खंडीत झाला असल्याने पोलादपूर शहराचा नळपाणीपुरवठा बंद झाला आहे. मुख्याधिकारी विराज लबडे यांनी सदर
रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तातडीने पाठपुरावा केला. यामुळे राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण ठोक तरतुदीतून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती ना. तटकरे यांनी दिली. यावेळी महाड नगरपालिका क्षेत्रातील पुरानंतर निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठी राज्यसरकारने 50 लाखांच्या निधीची तातडीने उपलब्धता करून दिली असल्याचीही माहिती ना. अदिती तटकरे यांनी दिली.
जुनी नळपाणी पुरवठा योजना पोलादपूर ग्रामपंचायत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली असून रायगड जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांकडून वाहून गेलेल्या जॅकवेलचे तसेच नवीन जॅकवेलला तडे गेल्याने दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्च यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करून राज्यसरकारला पाठविण्यात येणार आहे. पोलादपूर नगरपंचायतीकडे अभियंत्यांची पदे रिक्त असल्यानेही तातडीची बाब लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात आली असल्याचे यावेळी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी सांगितले.
पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी वाहून गेलेल्या जॅकवेलमधील पंपांची तसेच पॅनलची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून येत्या दोन-तीन दिवसांत नळपाणी पुरवठा योजना पोलादपूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम असेल, असा विश्वास व्यक्त केला.