| उरण | प्रतिनिधी।
चक्रीवादळ आणि वादळी वाऱ्याचा फटका जेएनपीए बंदरातील न्हावा-शेवा येथील फिपोर्ट टर्मिनलला बसला असून, सोमवारी (दि. 6) सकाळी जहाजावरील कंटेनर उडाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
उरण तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जेएनपीए बंदरातील या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आवश्यक मदत तातडीने उपलब्ध न झाल्याचा आरोप काही कामगारांनी केला असून, त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.







