| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तळोजा येथे एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याने ते जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण फाटा येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे, गोपनीय विभागाचे मनोज पाटील, पोलीस हवालदार माधव शेवाळे, चालक समाधान पाटील हे कर्तव्यावर असताना एका मच्छी वाहून नेणाऱ्या टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात थर्माकोलचे बॉक्स भर रस्त्यात पडले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरु होती. हा प्रकार नितीन ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांच्या सोबत असलेल्या पथकाच्या साहाय्याने महामार्गावर धाव घेऊन रस्त्यावर पडलेले थर्माकोलचे मोठे बॉक्स त्वरित बाजूला केले. त्यामुळे होणारे अपघात टळले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघात टळले
