दोन एसटी बसचा अपघात

अपघातामुळे वाहतूक कोंडी

। सुकेळी । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीमध्ये कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुरुवारी (दि.5) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांच्या जवळपास 2 ते 3 किमी. पर्यंत रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

कणकवली आगाराची मुंबईकडे जाणारी कणकवली-बोरीवली एसटी सुकेळी खिंडीमध्ये आली असता एका वळणावरती पनवेल आगाराची महाडकडे जाणाऱ्या गाडीच्या चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणा-या एसटी बसला समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात दोन ते तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या मार्गावर वाहनांच्या जवळपास 2 ते 3 किंमी पर्यंतच्या लांबच लांब रांगा लागुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे अक्षरशः हाल झालेले दिसून येत होते. या अपघाताची खबर मिळताच वाकण टॅबच्या सहायक पोलीस निरीक्षक गितांजली जगताप यांच्यासह त्यांचे सर्व कर्मचारी तसेच नागोठणे पोलीस, कोलाड पोलीस यांनी अथक प्रयत्न करुन दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. जवळपास 3 ते 4 तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीतरित्या सुरू करण्यात आली.

Exit mobile version