चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वैभववाडी तालुक्यातील तळेरे-कोल्हापूर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एडगाव येथील रामेश्‍वर सर्व्हिसिंग सेंटरनजीक चालकाला डुलकील लागल्यामुळे मिनीबसचा अपघात झाला असून, दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. शीतल चप्पा (37) व प्रकाश मंथानिया (33) हे दोन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुंबईतील एका कंपनीत काम करणारे हे सर्व कर्मचारी आहेत. सहलीनिमित्त हे सर्वजण मिनीबसने गोव्याला निघाले होते. याच दरम्यान एडगाव येथे चालकाला झोप आल्यामुळे गाडी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला.
या अपघातानंतर एडगाव येथील तरुण मदत कार्यासाठी धावले. येथील हेमंत रावराणे, सचिन रावराणे, रवि रावराणे, नीलेश रावराणे, रोहन सुतार, बच्चाराम रावराणे या तरुणांनी पोलिस येण्यापूर्वीच जखमींना रुग्णालयात दाखल केले. या बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते.

Exit mobile version