पाच जणांचा जागीच मृत्यू; चार जखमी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव – जालना महामार्गावर एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. बोलेरो गाडी आणि ट्रकच्या भीषण धडकेमध्ये पाच प्रवासी जागीच ठार झालेत. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्त बोलेरो गाडी भाविकांना घेऊन जालन्यामधून शेगावला निघाली होती. त्याचवेळी पहाटे साडेपाचच्या सुमारास या गाडीला देऊळगावजवळ खामगाव-जालना मार्गावर भीषण अपघात झाला. बोलेरो गाडी आणि ट्रकने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोमधील ९ जणांपैकी पाचजण जागीच ठार झाले. गाडीचा ट्रकला धडक देणारा पुढील भाग पूर्णपणे उद्धवस्त झालाय. मृतांमध्ये गाडीच्या चालकाचाही समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर देऊळगाव राजा तसेच जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.