। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड पोलिस ठाण्यासमोर तसेच कोलाड रेल्वे पुलाखाली रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत. परंतु, या गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीपासुन कोलाड रेल्वे पुलापर्यंत एका बाजूचा सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. यामुळे येणारी-जाणारी वाहतूक या महामार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गालगत राजिप केंद्र शाळा, हायस्कूल, पोलिस ठाणे, बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे या मार्गाने खांब-कोलाड परिसरातील असंख्य नागरिक, रुग्ण व विद्यार्थी ये-जा करीत असतात. शिवाय हा मार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या महामार्गाने वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. यामुळे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोलाड पोलिस ठाण्यासमोर तसेच कोलाड रेल्वे पुलाखालील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. परंतु, गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्यामुळे या महामार्गांवरून ये-जा करणार्या वाहन चालकांना हे गतिरोधक दिसत नसल्याने वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही.
यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत असुन दोन दिवसांपूर्वी एक महिला दुचाकीवरून पडून जखमी झाली होती. तसेच, रात्रीच्या वेळी रस्त्याला पथदिवे नसल्यामुळे हे गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.