। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुका पर्यटन क्षेत्र असल्याने रोज शेकडो पर्यटक राजपुरी येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात. पर्यटक आपली खासगी वाहने मुरुड शहरातील मच्छी बाजारातील रस्त्यावरून नेत असल्यामुळे याठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे वाहन चालकांना तसेच स्थानिकांना या वाहतुक कोंडीचा रोजच सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीपासुन दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
मुरूड शहरातील लोकसंख्ये बरोबर गाड्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. यातच शहरातील रस्ते अरूंद असल्यामुळे गाडी पार्किंगसाठी देखील जागा अपूरी पडत आहे. यामुळे देखील स्थानिकांना वाहतुक कोंडीलो सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात सागर कन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनोहर मकु हे कृषीवल प्रतिनिधीनीशी बोलताना म्हणाले की, शुक्रवार ते रविवार पर्यटकांसह शेकडो वाहने या रस्त्यावर ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ये-जा करित असतात. त्यामुळे या तीन दिवशी बाजारपेठेतील रस्तावर एकेरी मार्ग करावे, जेणेकरून पर्यटकांना व स्थानिकांची या वाहतूक कोंडीपासुन सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.