I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
मालकांनी रस्त्यावर सोडलेल्या मोकाट गुरांना धडकल्याने एक मोटासायकलस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना अलिबाग तालुक्यातील चेंढरे विद्यानगर येथे घडली. शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास हा अपघात घडला. जखमी मोटासायकलस्वाराला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाल येथील रहिवाशी असणारा हा इसम अलिबागहून आपल्या घरी निघाला होता. मात्र विद्यानगर परिसरात रस्त्यात उभे असलेल्या मोकाट गुरांना मोटासायकल धडकल्याने अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे. प्रत्तक्षदर्शीनी रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात दाखल केले. अलिबाग परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. गुरांच्या मालकांनी आपली गुरे रस्त्यावर सोडून दिल्याने वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.