। माणगाव । वार्ताहर ।
माणगावपासून पाच कि.मी. अंतरावर असणार्या गारळ गावच्या हद्दीत मुंबई -गोवा महामार्गावर औषधे घेऊन जाणारा ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकच्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक जखमी झाला आहे. या अपघात सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास झाला. या अपघाताची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महादेव यशवंत कराले (47) यांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या अपघातातील आरोपी ट्रकचालक प्रितेश भागोजी गोलांबडे, रा. वडपाले, ता. माणगाव हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्र. एमएच 04/जी.आर. 4155 मध्ये औषधांचे बॉक्स घेऊन जात असताना माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत आल्यावेळी हा अपघात झाला.
रस्ता सरळ असल्याने पाऊस पडत असतानाही ट्रक भरधाव वेगात चालवून ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचा क्लीनर प्रणय अनिल करबेले, रा. वडपाले, ता. माणगाव याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक आरोपी प्रितेश गोलांबडे हे जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी रवाना झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सायगावकर करीत आहेत.