। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथून कर्जत येथे नातेवाईकांकडे जाणार्या प्रवासी रिक्षाला टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मिरचोली गावातील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षामधील दोन्ही प्रवासी तसेच टेम्पोचालकही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बल्लाळ परशुराम जोशी हे पत्नी वर्षासह त्यांच्या नातेवाईकांकडे रिक्षाने जात होते. जोशी दांपत्य यांनी नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकातून भाड्याने क्रमांक एमएच 46 एझेड 7092 ही रिक्षा भाड्याने केली. चालक वसंत पवार हे त्यांना घेऊन कर्जतकडे जात असताना नेरळकडून महादेव हॉटेलजवळ कर्जत दिशेकडून नेरळकडे जात असलेल्या टेम्पो एमएच 46 बीएफ 4953 हा मालवाहू टेम्पो दुभाजक तोडून रिक्षावर आदळला. या धडकेत रिक्षा रस्त्याच्या खाली तीन पलटी मारत शेतात कोसळली.
रिक्षाचालक वसंत पवार हे जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नेरळचे बल्लाळ जोशी आणि वर्षा बल्लाळ जोशी या अपघातात गंभीर जखमी झाले. तसेच टेम्पो चालक महेश भगत यांनाही दुखापत झाली. तिघांनाही रायगड हॉस्पिटल येथे आणले असता असता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वर्षा जोशी आणि बल्लाळ जोशी यांना अधिक उपचाराकरीता पनवेल येथील पटवर्धन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
टेम्पोचा एक्सेल तुटल्याने एक चाक निखळून टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो दुभाजक तोडून पलीकडे नेरळ-कर्जत रस्त्यावर गेला.त्यावेळी तेथून जाणार्या प्रवासी रिक्षेला जोरदार धडक बसल्याचे चालकाने सांगितले.