। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान येथील शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद विश्वनाथ सावंत यांना 31 जुलै रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत माथेरान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी माथेरानमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस अधिकार्यांकडे केली आहे.
माथेरान येथील शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसाद सावंत यांच्यावर कर्जत येथे 25 जून रोजी हल्ला झाला होता. राज्यात शिवसेना पक्षामध्ये जे राजकारण झाले त्यात सावंत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाठराखण करणारी फेसबुक पोस्ट केली होती. त्यावरून कर्जत येथे 12 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर रुग्णालयातून घरी आलेल्या सावंतांना 8707422109 या क्रमांकाच्या मोबाईलवरुन अज्ञात इसमाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दुपारी तीन वाजून 51 मिनिटांनी आलेल्या फोनवरील संभाषण हे हिंदी भाषेत होते. त्या व्यक्तीने कर्जत मे तू बच गया, लेकीन तुम्हारी नेतागिरी कर्जत मे की तो जान से मार देंगे अशी धमकी दिली.
याबाबत प्रसाद सावंत यांनी माथेरान पोलीस ठाणे येथे आपल्याला आलेल्या धमकीच्या फोनबद्दल तक्रार दिली. प्रभारी पोलीस अधिकारी शेखर लव्हे यांनी अज्ञात व्यक्तीने केलेल्या फोनचे ऑडियो रेकॉर्डिंग ऐकले. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
माथेरानमध्ये अशा प्रकारची धमकी पहिल्यांदा आली असून त्याबाबत माथेरानमधील राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच प्रसाद सावंत यांच्यावर 25 जून रोजी हल्ला करणारे आरोपी अजून फरार असून पोलिसांनी त्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस अजय सावंत, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सागर पाटील, भारतीय कामगार सेनेचे रत्नदिप प्रधान, राष्ट्रवादी काँगेसचे शहर अध्यक्ष राजेश दळवी, आरपीआय शहर अध्यक्ष अनिल गायकवाड,यांच्यासह नरेश काळे, सीताराम कुंभार, स्वाती कुमार, सीताराम शिंदे, माजी नगरसेवक शकील पटेल, वर्षा रोड्रिक्स आदी उपस्थित होते.